
जनमंथन वृत्तसेवा
पुणे/वडगावशेरी : पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दि. २५ जुलै रोजी सकाळी वडगावशेरीतील आनंदनगर बसस्टॉप येथे एका धावत्या स्कूल व्हॅनवर झाड कोसळले. सुदैवाने वाहनातील शाळकरी मुले आणि वाहनचालक सुरक्षित.
याबाबतची माहिती मिळत आहे की, मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यांवर आणि ठिकठिकाणी पाणी साचलेले असून शहरातील बऱ्याच ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांत घाट परिसरात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यातील मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात आला आहे.