पुणेगुन्हेगारीबीड

शासनाकडून मिळणारे वेतन पोलीस अधिकाऱ्यांना पुरत नाहीत का?

लाखोंची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर एसीबीकडून गुन्हा दाखल

Spread the love
ACB filed a case against PSI Dattatraya Sarjerao Shegar of chandan nagar police station demanded bribe of five lakhs
बीड येथील पोलीस निरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक यांच्यावरील कारवाई ताजी असतानाच पुण्यातही लाचेचे प्रकरण

वसीम खान / एस.एम.युसूफ़
पुणे / बीड (जनमंथन वृत्तसेवा) : लाखोंची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुणे एसीबी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून नुकतेच बीड येथील पोलीस निरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक यांच्याकडे लाचेच्या माध्यमातून जमा केलेले कोट्यावधींचे घबाड नुकतेच सापडल्याने राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली, हे प्रकरण व त्यावरील कारवाई ताजी असतानाच पुण्यातही लाचेचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे ‘शासनाकडून मिळणारे भरमसाठ वेतन पोलीस अधिकाऱ्यांना पुरत नाहीत का?’, असा प्रश्न व शंका समाजातून उपस्थित होऊ लागले आहे.

पुणे येथे घडलेल्या एका गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडी अंती तीन लाख रुपये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंदननगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सर्जेराव शेगर (PSI Dattatraya Sarjerao Shegar) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. दत्तात्रय शेगर हे पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) कार्यरत आहेत. एसीबीच्या या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत ४० वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Anti-corruption, Pune) तक्रार केली आहे. तक्रारदार हे महावितरण विभागात नोकरी करतात. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात मिटर चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे पीएसआय शेगर यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्याचा तपास आपण स्वत: करीत असून पुढील कारवाई न करण्यासाठी शेगर यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांना एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडी अंती त्यांच्याकडून ३ लाख रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेगर यांनी तक्रारदार यांच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपये लाच मागून तीन लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने पीएसआय दत्तात्रय शेगर यांच्यावर गुन्हा दाखल केलं असून या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP, Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Additional SP, Dr. Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीच्या पथकाने केली.

तर दोनच दिवसांपूर्वी बीड शहरात सुद्धा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Police Inspector Haribhau Khade) हे राहत असलेल्या भाड्याच्या घरातून चक्क १ कोटी ८ लाखांची रोकड, ७२ लाख रुपयांचे ९७० ग्रॅम म्हणजेच फक्त तीस ग्रॅम कमी १ किलो सोन्याचे दागिने, ४ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे ५.५ किलो चांदी असा एकूण १ कोटी ८५ लाखांचा ऐवज हे खाडे यांच्या भाड्याच्या घरातून जप्त करण्यात आले. याशिवाय खाडे यांच्या नावावर बारामती, इंदापूरमध्ये प्रत्येकी फ्लॅट, इंदापूरमध्ये व्यापारी गाळा, तसेच बारामती व परळीत दोन फ्लॅट असलेली कागदपत्रे एसीबीच्या पथकाने जप्त केली आहेत. तर जाधवरांच्या घरात २२ तोळे म्हणजेच जवळपास पाव किलो सोन्याचे दागिने मिळाले. बीड एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे (Beed ACB Dy. SP, Shankar Shinde) यांनी लाचखोर सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर (ASI, Ravi Bhushan Jadwar) यांच्या घराचीही झाडाझडती घेतली. त्यांच्या घरात तब्बल २२ तोळे सोने आणि रोख १८ हजार रूपये एवढी रक्कम मिळाली आहे. ती सर्व रक्कम बीड एसीबीने जप्त केली आहे. या प्रकरणात लाच स्वीकारताना कुशाल प्रविण जैन (Kushal Pravin Jain) यास रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यास गुरुवारी (दि. १६) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची (२० मे पर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पोलिस अधिकाऱ्यांच्या मागे पोलीस

बीड येथील पोलीस निरीक्षक खाडे आणि सहाय्यक उपनिरीक्षक जाधवर हे घटना उघडकीस येण्यापूर्वीच फरार झाले आहेत. पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक उपनिरीक्षक रविभूषण जाधवर हे दोघेही परजिल्ह्यात होते. त्यांच्यावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून दोघे फरार आहेत. त्यांच्या शोधार्थ बीड एसीबीने दोन पथके रवाना केली आहेत. यामुळे अटक करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या मागे पोलीस लावण्यात आल्याने याची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.


हरिभाऊ खाडे, रवीभूषण जाधवर तडकाफडकी निलंबित

एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे प्रकरण राज्यभरात गाजले. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक उपनिरीक्षक रविभूषण जाधवर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×