
बीड | जनमंथन वृत्तसेवा : शहरात बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो हा संदेश देणाऱ्या माकडांच्या प्रतिकृती लावलेल्या चौकाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक असे नामकरण करावे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे आणि दैनिक जन मंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी व बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जीवन जगताना मानवाला अत्यंत महत्त्वपूर्ण असा महात्मा गांधीजींचा संदेश देणाऱ्या येथील माकडांची प्रतिकृती चार वर्षांपूर्वी अज्ञात माथेफिरूने तोडली होती. याकडे सर्वप्रथम एस.एम.युसूफ़ यांनी प्रशासन दरबारी निवेदन आणि बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधले होते, तसेच लागोपाठ तीन वर्षे महात्मा गांधींची जयंती असलेल्या २ ऑक्टोबर दिनी या चौकात आंदोलन केले होते. या आंदोलनात डॉ. तांदळे आणि युसूफ़ यांच्याशिवाय धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, शेख युनूस, इंजि. मुहम्मद मोईज़ोद्दीन, शेख मुबीन, माजी सैनिक अशोक येडे, रामधन जमाले, शेख सादिक यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. तिसऱ्या आंदोलनानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दखल घेत बीड नगर परिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी नीता अंधारे यांना या चौकातील तोडून टाकण्यात आलेल्या माकडांची प्रतिकृती पूर्ववत बसवावी असे आदेश दिल्यानंतर या चौकात माकडांची नवीन प्रतिकृती गेल्यावर्षी दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधींच्या जयंती चे औचित्य साधून बसविण्यात आली. शिवाय वट्ट्याला सुंदर टाइल्स ही लावण्यात आली. वट्ट्याच्या मागे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यामुळे या चौकाची शोभा वाढली आहे. मात्र रात्री अपरात्री ये-जा करणारी वाहने माकडांचा वट्टा तर पाहतात परंतु त्याखाली असलेले त्रिकोणी बांधकाम पाहत नसल्याने त्याला वाहन धडकून तुटले आहे. ते पूर्ववत चांगले करणे आवश्यक आहे. यापुढे येथील बांधकामाची क्षती होऊ नये याकरिता लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खांबाला माकडांच्या प्रतिकृती वर चांगला प्रकाश देणारी लाइट्स लावणे आवश्यक आहे. जेणेकरून वाहने धडकून येथील बांधकामाचे नुकसान होऊ नये. असे म्हटले असून चौकाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक असे नामकरण करावे अशी मागणी डॉ. संजय तांदळे आणि एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी व बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी संजय नवले आणि अशोक शेजुळ यांचीही उपस्थिती होती.