शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील उपकेंद्रासाठीच्या जागेची पाहणी समिती मंगळवारी करणार

प्रदीप जोशी | मुक्त पत्रकार
सांगली (जनमंथन वृत्तसेवा) : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji Vidyapeeth, Kolhapur) यांचे सांगली जिल्ह्यात उपकेंद्र होणार असून ते खानापूर येथे व्हावे असे एकमताने अधिसभेमध्ये ठरवण्यात आले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मंजुरी व वित्त विभागाकडून आर्थिक तरतूद यानुसार गुरुवार, दि. ४ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या उपकेंद्र समितीची बैठक शिवाजी विद्यापीठ येथे समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीमधील १० सदस्यांनी मंगळवार, दि. 9 जानेवारी २०२४ रोजी सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागेची पाहणी करावी व उपलब्ध परिसर व जागेनुसार विद्यापीठातील किती विभाग उपकेंद्र म्हणून या ठिकाणी सुरू करतील त्याचा सविस्तर प्रस्ताव, त्यासाठी लागणारे आर्थिक अंदाजपत्रक याची तरतूद इत्यादी गोष्टींची पूर्तता करून शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या शुक्रवार, दि. १९ जानेवारीच्या मॅनेजमेंट कौन्सिल सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवावा व मंजुरी घेऊन तात्काळ शासनाकडे सादर करून त्याचा पाठपुरावा करावा. जेणेकरून शासनाच्या वित्त विभागाकडून सदर उपकेंद्रास मंजुरी व आर्थिक तरतूद करणे सोयीची होईल अशी चर्चा आजच्या समितीच्या विशेष सभेमध्ये झाली असलेची माहिती शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य व उपकेंद्र समिती सदस्य श्री वैभव दादा पाटील यांनी दिली.
या समितीमध्ये अध्यक्ष डॉ. प्राचार्य व्ही. एम. पाटील व सदस्य म्हणून प्राचार्या डॉ. मेघा गुळवणी, डॉ. रघुनाथ डमकले, एड.स्वागत परुळेकर, एड. वैभव सदाशिवराव पाटील, विनिता तेलंग, काव्यश्री नलवडे, संजय परमने, विशाल गायकवाड, डॉ. प्रशांत खरात यांची विद्यापीठ व्यवस्थापन प्रशासनाने नियुक्ती केली आहे त्यानुसार त्यांचे कामकाज सुरू आहे.
यावेळी बोलताना वैभव पाटील यांनी सांगितले की, ” ही समिती प्रत्येक विभागाला आवश्यक असणाऱ्या जागेनुसर कोणते विभाग सुरू करणे आवश्यक व शक्य आहे याचा अभ्यास केला जाणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स,फूड प्रोसेस इत्यादी नवीन विभाग सुरू करता येतील काय या सर्वांचा विचार व अभ्यास करून समिती मॅनेजमेंट कौन्सिल समोर आपला अहवाल देणार आहोत व त्यानुसार पुढील सकारात्मक कार्यवाही केली जाईल.”